Monday, June 28, 2010

माझ्या मनाच्या घरट्यातल पाखरू

आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण रिमझिमणाऱ्या पावसाच्या निर्मळ सरीं प्रमाणे आनंदाची उधळण करीत यावा,त्यांना दोन्ही ओंजळीनी सावरून, येणाऱ्या पुढील आयुष्यात प्रांजळपणे मुक्त हस्ते उधळून टाक.....मुक्त मानाने मी दिलेल्या मन:पुर्वक शुभेच्च्छा.....अशा शुभेच्छा ज्या पुढे कधी मी सोबत नसले तरी माझं मन मात्र नेहमी तुझ्यातच गुंतून राहील म्हणून उधळतांना संपण्याची भिती बाळगु नकोस.......

“प्रेमाचा ओलावा...

मायेच्या ममतेचा जिव्हाळा”......


मा....

Sunday, June 27, 2010

मर्म-बंध

माझ्या घरट्यातलं पाखरू आहेस
अंगणातलं माझ्या पारिजातक आहेस
बागेतलं प्राजक्ताच फुल आहेस
प्रतिबिंब माझ्या मनाचे आहेस
चेहऱ्यावरचे हास्य आहेस
अंतकारणाचा धागा आहेस
जीवनाचा ताणा-बाणा आहेस
रेशमी नात्याची तू गुंफण आहेस
मखमली शालीची तू ऊब आहेस
मायेचा स्पर्श आहेस
प्रेमाचा ओलावा आहेस
हृदयाचे मर्म आहेस
डोळ्यांच तेज आहेस
कारुण्याचा ठेवा आहेस
भावनांचा आधार आहेस
आशेचा नवीन किरण आहेस, खरंतर.......
तुझ्यामुळेच माझ्या जगण्याला अर्थ आहे
म्हणून जगण्याची आशा आहे
माझ्या जीवनाचं सार्थक आहेस
माझ्या पूर्ण जीवनाची तपस्या आहेस
घराची तू धरोहर आहेस
संस्कारांची देण आहेस
कर्तृत्वाची खाण आहेस
देवानं दिलेली मौल्यवान देणगी आहेस
तू एक अनमोल हिरकणी आहेस
तू माझी मुलगी आहेस!!!!.....
जगाला त्याचीच खंत आहे..... पण!!!
मला तुझा अभिमान आहे
आजचा दिवस माझ्या जीवनात
मोठा भाग्याचा आहे!!!!!.....
हेच माझ्या साठी भक्कम आहे!!!!!!!.......

Friday, June 18, 2010

मंगलमुर्ती गणनायका

मंगलमुर्ती गणनायका

आदि वंदिते तुजला

गणाधिपती गणपती

सर्वांचा प्रिय गजमुखी

आराधना करते चतुर्थीची

कामना करी मन:पूर्तीची

मस्तकी उटी शेंदुराची

फुल शोभते रक्तवर्णी

वाहते दुर्वांची जुडी

वस्त्र शोभे तांबडे पितांबरी

शस्त्र रोखे डाव्या हाती

हाती एका मोदक लाडू

उरी आशीर्वादाचा गडू

Thursday, June 10, 2010

आठवण

सहज तुझ्या आठवणीने
मन माझे भरून आले
पहिल्या पावसाच्या सरीने
आपल्याला कसे चिंब ओले केले?
सहज तुझ्या चाहुलीने
येव्हढे कां दचकले
चोरून केलेल्या पहिल्या
भेटीने मला कसे धस्स केले
सहज तुझ्या स्पर्शाने
रोमरोम रोमांचित झाले
पहिल्या स्पर्शाने कसे
माझे यौवन बहरले
सहज तुझ्या कटाक्षाने
मी घायाळ झाले
घट्ट तुझ्या विळख्याने
कसे प्रेमपाशात गुंतविले

Monday, June 7, 2010

मृगाची पहिली सर....

टिपलेली पहिली सर....
मृगाची......धारा ...

मृगनक्षत्र,त्या पहिल्या सरीची आतुरतेनं वाट पाहणारे सर्वं जीव अर्थात माणूस
सुद्धा...केव्हढी किमया आहे त्या सरींमधे.खरा आनंद तर लता,वेली नी वृक्ष यांच्यातून ओसंडून वाहतांना दिसतो. वाटेला लागलेल्या त्यांच्या कोमेजलेल्या,थकलेल्या..नजरा,अगदी
पहिल्या सरीनेच टवटवीत,प्रफुल्लित,हर्षोल्हासाने अक्षरशः डोलायला लागतात..त्यांची पानं नी,
पानं तेजोमय होऊन आपली तृष्णा भागवतात.त्या व्याकुळ नजरा हर्षाने तेजस्वी दिसू लागतात.खरंच....कुणी त्यांचा आनंद टिपला?....टिपला की वाटतं,,एखाद्या सखी सजणीने प्रियकरासाठी गुणगुणल्यासारखं.......रानी पारवा भिजतो......आला गं..सुगंध मातीचा....बघ पाकळ्या ....थेंब अंगणी नाचती आला ...आला ..गं सुगंध मातीचा .....
रोमांचित भाव टिपणारे ते क्षण!!!! !!! निश्चितच सजीव मनाला हुरळवून जातात,तनाला सुखावून जातात...पर्णतेजानें अंतरंग बहरून,फुलून तेजोमय होते.हे सर्व निसर्गाचे क्लुप्त गुपीत आत्मसात करायला हवं प्रत्येकानं ...............
सरी
पावसांच्या सरीनं रिक्तं मन भरत होतं
रिक्तं मन भरतांना पहिल्या सरीं मनात उच्छृंखल हुंदडत,उधळत होत्या,पावलांचा छप...छप छप छप..आवाज करित थयथय नाचत होत्या........ते बालपण ओथंबलेले दिसंत होतं.........
थोडं भरल्यावर,,,सरीं तोलत डोलत भर घालत होत्या....तेंव्हा पौगंडावस्था दिसली
मग हलक्या हलक्या.....दबल्या...पावलांनी भर घालत होत्या,तेंव्हा तारुण्य लाजून हसंत होत.सरींनी मन भरलं.....त्यांना जीवनाच्या बंधनात बांधलेलं दिसलं....
आता सरीं मनात भरून, ओसंडून वाहात होत्या....त्यांना निसटतांना पाहून ओंजळीनी सावरावं वाटलं.......पण हातात येत नव्हत्या...जीवन होतं ते......ते तसंच वहात गेलं म्हणून खंत करीत..फक्तं पाहूच शकत होती मागचं सगळं आठवायला पूर्ण रिक्तं व्हावे लागत होते..........म्हणून फक्तं पहातच......पहातच होती. सरींवर सरीं..... भर घालतच होत्या

Wednesday, June 2, 2010

मुद्दाम

रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
कॉलेजला जाता येतांना मात्र
मी खाली मान घालायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
मंदिरात जातांना ओंजळीत
सुगंधी फुलं न्यायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
गुलाबाला पाणी देतांना
स्मितहास्य करायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
ओल्या केसांना सुकविण्यास
उन माखत बसायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
सुर्याला अर्ध्य देतांना
तुझ्या नजरेत नजर मिळवायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
तुळशीला नमस्कार करतांना
तुझी आराधना करायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
चतुर्थीच्या चंद्राच्या निमित्तानं
गच्चीवरून तुलाच न्याहाळायची ...पण
आज अचानक तुला समोर उभं पाहून
मी माझं सर्वस्व विसरली......

मी तुझाच

जीवन जगत असतांना
कधी मी तुझ्याकडे पाहिलेच नाही
बालपण खेळात रंगले
खेळता खेळताच वयात आले
तारुण्यात आल्यावर प्रेमात गुंतले
प्रेमाच्या खुणा रंगवीत असतांनाच
प्रौढत्व आले
थोरांच्या सानिध्यात
संसार थाटत बसले
आता ध्यास लागला वृधत्वाचा
खरचं......आज आठवण झाली तुझी
उभं आयुष्य असंच वाया घालवलं
सगळं संपत आल्यावर
तू आठवलास
मग तुलाच दोष दिला
सर्वं दिलं मला.......
आठवण तेव्ह्ढी
कां नाही दिली तुझी?
तू हि हसंलांस!!!!! म्हणालास
मी तर नेहमीच तुझ्या जवळ होतो
मी कधी तुला दूर होऊच दिलं नाही
हे सर्वं खेळ मीच खेळवत होतो
तुला कसे कळले नाही ?
तू मला कधी वेगळी भासली नाहीस
आठवण परक्याची करायची असते
जवळ असलेल्याची उणीव भासत नाही
म्हणून कधी आठवण येत नाही
मी नेहमी तुझ्यातच गुंतलो होतो
तू माझ्यात समरस झालीस
हे तुलाही कधी कळले नाही...
आपुलकी असते ही.......