Saturday, May 29, 2010

नशीब

ओंजळी भरुन फुलांची घेतांना
काही फुलं ओंजळीतुन सांडली....
खाली पडलेल्या फुलाकडे पाहून, म्हटलं!!!
असं असतं नशीब!!!
एकाच झाडाचे
एकाच टोपलीत वेचलेले
ओंजळीत भरतांना
काही फुलं ओंजळीत आली
काही जमिनीवर सांडली.....
ओंजळीतली फुलं हसत होती,
जमिनीवरची केविलवाणी पहात होती.....
ओंजळीतील फुलं म्हणजे नशीब.....नी
जमिनीवर सांडलेली फुलं
म्हणजे....नियती!!!

राजश्री नाथक

Friday, May 28, 2010

स्वप्न

स्वप्न

अजूनही तुझ्या श्वासाचा सुगंध
मला धुंद करतो........
अजुनही तुझ्या शरीराचा कोमल स्पर्श
माझे रोमांच जागे करतो
अजुनही तुझ्या येण्याच्या चाहुलीने
मन माझे हरखून जाते
अजुनही तुझ्या डोळ्याच्या खुणांनी
नजर माझी लाजून चूर् होते
अजूनही तुझ्या कटाक्षाने
हृदय माझे छेदून जाते
अजुनही तुझ्या स्वरांच्या सुरांनी
प्रीत हलकेच मनी जागवून जाते
अजूनही तुझ्या गोड मिठीनी
मी स्वप्नांत सुखावून जाते
अजुनही आपल्या संसाराचीं
मी भातुकली मांडत राहते
भातुकली मांडत असतांना
मात्र मी अजुनही
तुझीच वाट पहात असते .........

राजश्री नाथक

Friday, May 21, 2010

गुढ

नभ दाटून यावे तसे,
उरही दाटून यावा.....
घन कोसळूनी बरसावे,
तसे अश्रू नयनी तरळावे.....
छाया नभाची थंड तशी,
माया ममता मायेची.....
मेघ जसे काळोखाचे ,
दुखः दिसे मज आयुष्याचे....
लखलखते वीज आकाशी तशी,
आर्त पुकारी आईची......
सरी पावसाच्या तसें,
सुख दुखः जीवनाचे...
.हलकी झुळूक थंड वाऱ्याची तशी,
फुंकर वाटे मायेची ....
ऋतू तीन निसर्गाचे तसें,
तीन ऋतू आयुष्याचे....
बांध हे धरणाचे तशे,
बंधन हे नात्यांचे....
मर्म जसे धरतीचे तशे,
रंग अंत:करणाचे.....
शोधुनिया सापडेना,
हे गुढ जीवनाचे.......

Monday, May 17, 2010

घर कौलारु


दारी वृन्दावन उभे
डौल त्याचा रुबाबी
वाट पाहे तूलसायीची………
सडा सारवणं भोवती
पाहे वाट रान्गोळीची ………
दिवा सजला आकाशी
पाहे वाट तेला वातीची…….
जुन्या विटांचा भिंती
घर कव्लारू शोभाते
पाहे वाट आवाजाची………
उंच माडाची हि वृक्ष
बहरती ठाई ठाई
पाही वाट वाऱ्याची……..
उंच झेंडाही उभारला
वाट पाहे अतिथीची………..

Saturday, May 15, 2010

देणे

बाबा, तुम्ही आशीर्वाद
मला भरभरून दिलेत.
ते सांडू नयेत म्हणून,
लहान असतांना त्यांना,
मुठीत साठवून ठेवले होते......
समज आल्यावर ओंजळीत ,
त्यांना सांभाळत होती........
लग्न झाल्यावर हृदयात
बाळगून होती..........
आज मलाही तुम्हाला ,
काही द्यावेसे वाटत होते ........
पण काय देऊ ?
प्रश्न पडला होता....कारण,
माझ्या जवळ असलेली,
प्रत्येकच गोष्ट तुम्ही,
दिलेली होती ........
तुमचेच तुम्हाला कसे देणार?
तुम्हीच मला सुचवले होते,
असे धरून ठेवशील
तर दिल्याची वाढ कशी होणार?
इतरांना दान कर.......
ज्याला ते धन मिळेल,
त्याची दुवा मिळेल.........
तीच माझी मौल्यवान ,
देणगी असेन ......तेंव्हा ....
तुम्ही दिलेल्या प्रत्येक
मौल्यवान वस्तूंपैकी
आशीर्वादाच धन मी लहानांना दिलं
आदर मी मोठ्यांना दिला......
आधार निराधाराला दिला.....
प्रेम निरागसांवर केलं......
.करूणा पिडीतांवर केली ..........
दृष्टी आंधळ्यास दिली.........
माया सृष्टीवर केली........
तटस्थता ममतेवर दाखवली.........
मूल्य नितिला दिली.......
संस्कार घराला दिले ...
परम्परा संस्कृतीला दिली.....
अभिमान कर्तृत्वाला दिला......
जिद्द ध्येयाला दिली............
प्रतिष्ठाशालीनतेला दिली .............
निष्ठां गुरुवर ठेवली ......
कोमलता प्रेमाला दिली..................
प्रीत निसर्गाला दिली .....
अभिलाषा आशेला दिली...............
सामंजस्य शेजाऱ्याशी केले.....
मैत्री शत्रू सोबत केली......
विचार वैचारीकांना दिले ......
शब्द लेखणीला दिले......
स्वर सुरांना दिले....
मीपण देवाला दिले ......
राहिले फक्त एकच,...
धन्यवाद ..........
ते मी तुम्हाला अर्पिते .......

राजश्री नाथक

Monday, May 10, 2010

आई

आई, तू विचारलेल्या प्रश्नाचे,
मला आज उत्तर सापडले....
त्या दिवशी तू विचारत होतीस,
काय गं, आईवर कविता नाही लिहीलीस ?...
त्या वेळी अनेक उत्तरं मी शोधली,
तूला दिलीही उत्तरं, पण
नेमके उत्तर सापडत नव्हते...
तूझे समाधान ही, मी करु शकत नव्हते.....
आज,अचानक मला शोधता-शोधता उमजले...
अगं, कागदावर काय कविता लिहीता येते?
आईवर कविता तर ह्रदयात कोरल्या जाते...
माझ्या मनाच्या कोपर्यात,
तिला घडी घालून ठेवली आहे...
डोळ्यांच्या खुणांत तिला,
जपुन ठेवले आहे...
संस्कारात, तिला मी बांधुन ठेवले आहे....
वाचले असतेस मला तर,
मी गद्य् आहे, तुझ्या अंत्:करणाचे........
पद्य आहे जिवनाचे.............
निरखुन वाचलीस तर,
तुझ्याच जिवनाच्या कवितेचा,
सारांश आहे मी........


राजश्री नाथक ...

कविता सम्मेलन

आज कवितांचे सम्मेलन.
सर्वे कविता एकत्र जमल्या.....
म्हणे आज काल,
जो आला तो --
कविता लिहीतो....
स्वत्:ला कवी समजतो......
कव्याचा ना गंध कुणाला,
नी नसतो पत्ता पद्याचा......
व्याकरणाची परिभाषा___
ती तर कवितेला,
स्पर्शतही नाही.....
सर्वांची आप-आपली
मतं मांडुन झाली.
एक कविता मात्र,
काहीच बोलत नव्हती.
पण_ आता ती बोलू लागली....
म्हणाली कवितेला, काय लागते_
व्याकरण?
अंत्:करण लागते कवितेला,
जसे प्रेमाला.........
तेव्हाच स्पर्शुन जाते ...
प्रत्येकाच्या मनात,
घर करुन जाते .