बाबा, तुम्ही आशीर्वाद
मला भरभरून दिलेत.
ते सांडू नयेत म्हणून,
लहान असतांना त्यांना,
मुठीत साठवून ठेवले होते......
समज आल्यावर ओंजळीत ,
त्यांना सांभाळत होती........
लग्न झाल्यावर हृदयात
बाळगून होती..........
आज मलाही तुम्हाला ,
काही द्यावेसे वाटत होते ........
पण काय देऊ ?
प्रश्न पडला होता....कारण,
माझ्या जवळ असलेली,
प्रत्येकच गोष्ट तुम्ही,
दिलेली होती ........
तुमचेच तुम्हाला कसे देणार?
तुम्हीच मला सुचवले होते,
असे धरून ठेवशील
तर दिल्याची वाढ कशी होणार?
इतरांना दान कर.......
ज्याला ते धन मिळेल,
त्याची दुवा मिळेल.........
तीच माझी मौल्यवान ,
देणगी असेन ......तेंव्हा ....
तुम्ही दिलेल्या प्रत्येक
मौल्यवान वस्तूंपैकी
आशीर्वादाच धन मी लहानांना दिलं
आदर मी मोठ्यांना दिला......
आधार निराधाराला दिला.....
प्रेम निरागसांवर केलं......
.करूणा पिडीतांवर केली ..........
दृष्टी आंधळ्यास दिली.........
माया सृष्टीवर केली........
तटस्थता ममतेवर दाखवली.........
मूल्य नितिला दिली.......
संस्कार घराला दिले ...
परम्परा संस्कृतीला दिली.....
अभिमान कर्तृत्वाला दिला......
जिद्द ध्येयाला दिली............
प्रतिष्ठाशालीनतेला दिली .............
निष्ठां गुरुवर ठेवली ......
कोमलता प्रेमाला दिली..................
प्रीत निसर्गाला दिली .....
अभिलाषा आशेला दिली...............
सामंजस्य शेजाऱ्याशी केले.....
मैत्री शत्रू सोबत केली......
विचार वैचारीकांना दिले ......
शब्द लेखणीला दिले......
स्वर सुरांना दिले....
मीपण देवाला दिले ......
राहिले फक्त एकच,...
धन्यवाद ..........
ते मी तुम्हाला अर्पिते .......
राजश्री नाथक
No comments:
Post a Comment