Wednesday, August 1, 2012

खरंच तुझ्या सवे

खरंच तुझ्या सवे
 मी बालपणी खेळले होते कां?
लपाछपी खेळतांना कधी 
मी हरवले होते कां?
खरंच तुझ्या सवे
 मी भातुकली मांडली होती कां?
खेळामधले सर्व डाव
 तूच जिंकला होतास कां?
खरंच तुझ्या सवे
माझे तारुण्य बहरले कां?
बहरतांना माझे सौंदर्य
 तूच टिपले होतेस कां ?
खरंच तुझ्या सवे
मी वडाच्या सावलीत बसले होते कां?
पारंब्यांना लटकून
तूच मला झुलवले होते कां?
 खरंच तुझ्या सवे
मी पावसात चिंब भिजले होते कां?
पण पावसाच्या त्या सरींनी
 कांय  मलाच ओले केले होते कां?
  खरंच तुझ्या सवे
मी नदीच्या तिरी वाळूचे घर बनवले होते कां ?
नि अल्लड लटक्या लाटेने घर मोडलेले 
आपण दोघांनी  पहिले होते कां ?
 खरंच तुझ्या सवे 
मी रात्री हातात हात घालून चालत होते कां?
चांदण्यांच्या  मंद प्रकाशात हात माझा 
तूच  झटकला होतास कां ?
 खरंच तुझ्या सवे
 मी 
गीत गुणगुणले होते कां ?
प्रेम गीत गातांना सूर तूच छेडले होते कां ?
 खरंच तुझ्या सवे मी 
मखमली हिरवळीवर चंद्र पौर्णिमेचा पाहत होते कां ?
चंद्राला निरखून पाहतांना कुशीत तुझ्या तेव्हां  मीच  जवळ होते कां ?
 खरंच तुझ्या सवे
 मी तुझ्या स्वप्नात रमली कां ?
स्वप्नात रमले असतांना तूच स्वप्नभंग केले कां?
  खरंच तुझ्या सवे
 मी उंबरठा ओलांडला होता कां?
उंबरठा ओलांडतांना मी कधी मर्यादांत अडखळले होते कां?
   खरंच तुझ्या सवे
 मी प्रेमाच्या शपथा घेतल्या होत्या कां ?
घेतल्या शपथातील एक तरी शपथ तुला आठवते कां ?
 खरंच तुझ्या सवे
 मी  संसार-चित्र रंगविली कां ? 
रंगवतांना चित्र माझे तूच बेरंग केले  होते कां?
खरच तुझ्या सवे 
 मी जीवनपूर्ण जगले कां ?
जीवन जगता जगता माझे जगणे  अधुरे  राहिले कां ?
 खरच तुझ्या सवे
 मी आरश्यात  आपली प्रतिमा न्याहाळत होती कां ?
कां--  ती प्रतिमा तुझां आभास करत होती कां?

No comments:

Post a Comment